चाइल्ड first

esakal वर हा लेख वाचला. सर्व पालकानीं वाचावा इतका सुन्दर लेखा आहे... तर vaacha

(वृंदा वर्तक, भोसरी।) अपयश कायमचे नसते आणि यशाचे मार्ग कधी थांबत नसतात, हे मनात ठेवून पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा पालक आपल्याला प्राधान्य देतात, हे मुलांच्या लक्षात आले की तीही आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊ लागतात...स्त्रीदाक्षिण्य म्हणून आपण "लेडीज फर्स्ट' म्हणतो. त्याचप्रमाणे मूल असलेल्या प्रत्येक घराने "चाइल्ड फर्स्ट' म्हणायला हवे... नुकतीच दोन-तीन पुस्तके वाचनात आली. एक म्हणजे नीला सत्यनारायण यांनी लिहिलेले "एक पूर्ण... अपूर्ण!' डाऊन्स सिन्ड्रोम असणाऱ्या आपल्या मुलाला वाढवताना आलेल्या बावीस वर्षांच्या अनुभवांचे बोलके वर्णन त्यान्नी केले आहे। या पुस्तकाची अर्पणपत्रिकासुद्धा त्यांनी "जगातल्या प्रत्येक आईला...' अशी भावुक लिहिली आहे.

दुसरे एक पुस्तक म्हणजे "शिशिरातील पालवी' हे अपंग मुलांच्या पालकांचे अनुभव कथन करणारे पुस्तक. त्यातील पालकांचे जबाबदारी निभावणे म्हणजे जणू एक यज्ञच आहे. परताव्याची फारशी अपेक्षा नसताना मुलांसाठी घेतलेले परिश्रम हे पालकत्वाचा एक महत्त्वाचा पैलू दाखवतात. त्यातील एका मातेनं म्हटलं आहे, ""जेवढा अभिमान मला माझ्या दहावीला बोर्डात येणाऱ्या मुलाचा वाटतो, तेवढाच अभिमान मला माझ्या दुसऱ्या मतिमंद मुलाचा वाटतो!'' यानंतर डॉक्‍टर अरुण हतवळणे यांनी लिहिलेले "१० वी व १२ वीतील यशाचा राजमार्ग!' आपल्या हुशार मुलांच्या बुद्धीला वळण लावताना त्यांनी घेतलेले कष्ट खरोखरच स्फूर्तिदायक आहेत. ही सर्व पुस्तके आपल्याला खूप काही शिकवतात. मुले ही प्रत्येक घराचा संवेदनशील घटक असतात. आपले मूल कसेही असले तरी प्रत्येक मातापित्याला ते प्रियच असते. मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना चालना दिली, त्यांच्या छोट्या-छोट्या कामगिरीचेही कौतुक केले, तर मुलांचाही उत्साह दुणावतो. अभ्यास एके अभ्यास असा उपदेश न करता त्यांना भटकायला निसर्गात न्या, उडणारे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी, हिरवीगार वनराई, उघडे डोंगरकातळ यांची ओळख करून द्या. टीव्हीवरील नॅशनल जिऑग्राफिक, ऍनिमल प्लॅनेट असे चॅनेल बघायला उत्तेजन द्या. मुलांना आवडत असेल तर प्राणी पाळू द्या. विविध भाषांमधील समृद्ध ग्रंथभांडार त्यांच्यासमोर उघडे करा. मुलांशी खूप बोला, गप्पा मारा, विनोद सांगा. त्यांच्या हजारो प्रश्‍नांना न कंटाळता उत्तरे द्या. मोडल्या तरी चालतील; पण विविध वस्तू त्यांना हाताळू द्या. वेगवेगळ्या समारंभांना, खेळांना, भाषणांना नेऊन त्यांना भोवतालच्या जगाची ओळख करून द्या. कपडे, खाऊ, खेळणी यांबाबतचे छोटे छोटे निर्णय त्यांच्यावरच सोपवा. त्या निर्णयाची जबाबदारीही त्यांनाच घ्यायला लावा. आदर्श जीवनमूल्यांची त्यांना जाणीव करून द्या. अब्राहम लिंकन यांचे हेडमास्तरांना लिहिलेले पत्र तर प्रत्येक घरात असावे. आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा घामाचा एक रुपयाही जास्त मौल्यवान आहे, फसवून मिळालेल्या यशापेक्षा प्रामाणिकपणे मिळालेली हारसुद्धा महत्त्वाची आहे, हे मुलांना पटू द्या. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे सांगून मुलांचा धीर वाढवा. यामुळे मुले थोड्या अपयशाने न खचता दुप्पट जोमाने मेहनत करून मोठी प्रगती साधतात. मुलांना भरपूर आत्मचरित्रे, प्रवासवर्णने वाचायला द्यावीत. मुलांनी कंटाळा केला तर आपण वाचून त्यांना त्यातील प्रसंग, गप्पा मारता मारता सांगावेत; त्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. कठीण परिस्थिती प्रत्येकावरच येऊ शकते. त्यातून धैर्याने मार्ग काढणाराच यशस्वी होतो, हे मुले त्यातून शिकतात. 
जगातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा आपले पालक आपल्याला प्राधान्य देतात, हे मुलांच्या लक्षात आले की मुलेही आपल्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊ लागतात. याचबरोबर पालकांनी मुलांसमोर आपले वागणेही जबाबदारीचे ठेवले पाहिजे. मुलांसमोर भांडणे, शिवीगाळ करणे, खोटे बोलणे वगैरे टाळावे. याबरोबरच आपापसांतील थोडेफार मतभेद प्रश्‍न, पैशांचे व्यवहार याबाबत मुलांना पूर्णपणे अंधारात ठेवू नये. त्यांना सामोरे जाण्यामुळेच मुलांची जीवनातल्या प्रश्‍नांशी ओळख होते. मी कोणी बालशिक्षणतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ नाही. मीही एक सर्वसामान्य पण या सर्व अनुभवांतून गेलेली पालक आहे. माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या वर्षी काही निराशेचे क्षण आले. गुण, प्रवेश वगैरेच्या चरकात तो व आम्हीही पिळून निघालो. पण हे सर्व होत असताना त्याचा स्वतःवरचा व आमचा त्याच्यावरचा विश्‍वास डळमळला नाही. आम्ही त्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. कितीही कमी गुण मिळाले, अपयश आले, निर्णय चुकले, तरी जोपर्यंत तुझे प्रयत्न सच्चे आहेत तोपर्यंत आम्ही तुझ्याबरोबरच आहोत, असे आश्‍वासन दिले. लहानपणापासूनच त्याला वेगवेगळे अनुभव घेण्याची भरपूर मोकळीक दिली. ट्रेक्‍सना पाठवले, त्याच्यासाठी कुत्रे पाळले, अवांतर वाचनासाठी आवडलेली पुस्तके घेण्यास कधीच नाही म्हटले नाही. आज आमचा मुलगा कॉम्प्युटर क्षेत्रात परदेशात उत्तम नोकरी करत आहे, जगभर फिरत आहे. अपयशाच्या अनेक खाचखळग्यांतून त्याने मार्ग काढला आहे. आजही तो आपले अनुभव आमच्याशी शेअर करण्यास उत्सुक असतो. सध्या निकालाचे, नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचे दिवस आहेत. ज्या मुलांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले किंवा पूर्णच अपयश आले त्यांच्या पालकांनी "आता सर्व काही संपलेच, मुलाच्या आयुष्यात पुढे फक्त अंधारच आहे' असा आततायी विचार करू नये. आधीच निराश झालेल्या मुलांवर लगेच "डफ्फर' किंवा "ढ', "बिनकामाचा' असा शिक्का मारू नये. किंवा इतरांनी मारला तरी तो मनावर घेऊ नये. अपयश कायमचे नसते आणि यशाचे मार्ग कधी थांबत नसतात, हे मनात ठेवून आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. दहावी, बारावीच्या कमी मार्कांनंतरही माणूस आयुष्यात उत्तम यश मिळवू शकतो. त्यासाठी अनेक उत्तम मार्ग आहेत. फक्त इच्छा, आत्मविश्‍वास, दृढनिश्‍चय व प्रामाणिक प्रयत्न हवेत.

No comments:

Becoming a Parent Is a Gift

I found this very touching article on npr.org. Just felt like sharing it with everyone ... Becoming a Parent Is a Gift by Chris Hun...