लातूर, ता. २५ - खरकटे, उष्टे अन्न, सडलेल्या भाज्या, खराब पीठ, भाज्यांची सालपटे, देठ हे नेहमी गटारीत किंवा कचराकुंडीत टाकण्यावर भर असतो. पण, हेच टाकावू अन्न जर उपयोगात आणले तर त्याचा "क्रॉप्रेसड् नॅचरल गॅस' (सीएनजी) तयार होऊ शकतो. .......
पिश्टमय व शर्कराचे ऑक्सिजनविरहित जैविक अपघटन (अनऍरोबिक डायझेशन) या पद्धतीचा वापर करून येथील जनकल्याण निवासी विद्यालयात "सीएनजी' गॅस तयार केला जात आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. या पद्धतीने दररोज ४५ किलो गॅस तयार करून शाळेतील पाचशे मुलांचा स्वंयपाक केला जात आहे.
लातूर जिल्ह्यातील भूंकपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकारातून हरंगुळ (बु., ता. लातूर) येथे जनकल्याण निवासी विद्यालय सुरू झाले. प्रयोगात्मक व संस्कारक्षम शिक्षण या शाळेतून दिले जात आहे. या विद्यालयात ५०० विद्यार्थ्यांची निवासाची सोय आहेत. या विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी वर्षाकाठी दोन लाख ८० हजार रुपये खर्च येत होता. या विद्यालयाचे मुख्याध्यापक मोहनराव कुलकर्णी यांनी हा खर्च कमी कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले. अपारंपरिक ऊर्जेच्या प्रचार व प्रसारात आघाडीवर असलेली व वेगवेगळे प्रयोग करणारी पुणे येथील अप्रोप्रीएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (आरती) ही संस्था पुढे आली. या संस्थेचे मानद संशोधक दीपक कान्हेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग उभारण्यात आला आहे.
पाचशे विद्यार्थ्यांचे खरकटे अन्न, शिळ्या भाज्या, सडलेल्या भाज्या, भाज्यांचे देठ, गिरणीत सांडलेले पीठ वायाच जात होते. या प्रयोगात ते एकत्र करण्यात आले आहे. साधारण १७० किलो हे "वेस्ट'चे मिक्सरमधून काढून शेण व कोळशाचा वापर करून जिवांणूची वाढ करून ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यात ते टाकले जाते. गोबरगॅसमध्ये वायू तयार होण्यासाठी ४० दिवसांचा कालावधी लागतो. येथे पाण्याच्या टाक्यात जिवाणूंची कॉलनीच विकसित केली असल्याने २४ तासांत वायू तयार होत आहे.
या संदर्भात श्री. कान्हेरे म्हणाले, ""देशातील हा पहिला मोठा प्रयोग आहे. गोबरगॅसमध्ये मिथेन व कार्बन डायऑक्साईड असतो. कार्बन डायऑक्साईड हा जळत नाही व जळायला मदत करीत नाही. त्यामुळे ज्योतीचा ताव कमी असतो. पाण्याच्या थेंबामुळे ज्योत अधूनमधून विझते; तसेच त्याच्यात हायड्रोजन सल्फाईड हा विषारी वायू असल्याने त्याचा त्रास होतो. हे लक्षात घेऊन एका छोट्या ड्रममधून मोर्चुदाच्या द्रावणातून (कॉपर सल्फेट) हा वायू पास करण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथे हायड्रोजन सल्फाईड विरघळण्यास मदत झाली. तेथे एक गॅस साठविण्यासाठी मोठी टाकी उभारण्यात आली आहे. त्यात मिथेन व कार्बन डायऑक्साईड साठविला जातो. तेथे कॉम्प्रेसरचा वापर करून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे मिथेन साठण्यास जास्त जागा मिळत आहे. दोन हजार आठशे किलो कॅलरी हे गोबरगॅसचे औष्णिक मूल्य आहे. तर अनऍरोबिक डायझेशन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या वायूचे पाच हजार ५०० किलो कॅलरी औष्णिक मूल्य आहे. येथे दररोज ४५ किलो क्रॉम्प्रेसड नॅचरल गॅस (तीन सिलिंडर भरतील एवढा) गॅस तयार करून त्यावर ५०० विद्यार्थ्यांचा स्वयंपाक केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या प्रयोगाकरिता साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. या गॅसचा विजेसाठी वापर केला तर दररोज ६० युनिट वीज तयार होऊ शकते किंवा दहा एचपीची मोटार २० तास चालू शकते. येथे ५०० विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करण्यात येत आहे. शहरात असे भरपूर वेस्ट आहे. त्यामुळे लातूर नगरपालिकेने हा प्रयोग करावा म्हणून मुख्याधिकारी अनिल मुळे यांच्याशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती श्री. कान्हेरे यांनी दिली.
हा एक चांगला प्रयोग आहे. असेच प्रयोग इतर संस्थांनी केले तर त्याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी हा प्रयोग करता येईल का? याकरिता प्रयत्न केले जाणार असल्याचे कृषी विकास अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले।
0 comments:
Post a Comment