Monday, July 23, 2007
वणव्यांशी संघटित लढाई
वाळलेल्या गवतावर, काडी-कचऱ्यावर कुठून तरी ठिणगी पडते आणि त्यातून भडकलेली आग जंगलाचा मोठा भाग कवेत घेते. असे वाऱ्याच्या वेगाने पसरणारे वणवे आटोक्यात आणण्याचे आव्हान अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील यंत्रणांना ठराविक मोसमात नित्यनेमाने पेलावे लागते. नुकताच अमेरिकेतील ताहोई परिसरात पेटलेला वणवा बरेच दिवस धुमसत राहिला.
अशा आपत्तींचा सामना करणारी यंत्रणाही तितकीच तत्पर आणि संघटित असावी लागते. अमेरिकेने त्यासाठी उभारलेल्या "नॅशनल इंटरएजन्सी फायर सेंटर'ची माहिती आपल्यालाही उपयुक्त ठरू शकेल.
"संघटना हे पाश्चात्त्य जगताचे- विशेषतः अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे,' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. त्याचे मर्म आपल्याला अशा प्रकारच्या प्रतिसादी यंत्रणांमधून जाणून घेता येऊ शकते. आपत्तीची पूर्वसूचना किंवा तत्काळ माहिती मिळणे, त्यावर उपाययोजनांसाठी यंत्रणा कायम सज्ज असणे आणि घटनास्थळी पोचून ती कमीत कमी वेळात प्रत्यक्ष कार्यरत होणे या तिन्ही गोष्टी त्यात महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी देशपातळीवर समन्वयाची व्यापक यंत्रणा अमेरिकेने उभी केली आहे.
वणवा नेमका कुठे लागला आहे किंवा लागण्याची शक्यता आहे, हे ओळखण्यासाठी उपग्रह छायाचित्रांबरोबरच विमानांद्वारे "इन्फ्रारेड' तपासणीही केली जाते. या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत सुमारे चौदा हजार फूट उंचीवरून सहा चौरस इंच भूभागातील आगही ओळखता येऊ शकते. अमेरिकेची एकूण अकरा प्रदेशांमध्ये विभागणी केली असून, तेथील आगीच्या, वणव्यांच्या घटनांच्या अद्ययावत नोंदी ठेवण्यात येतात. त्यातून तपशीलवार "फायरमॅप' तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात वणव्याची सर्वाधिक शक्यता कोठे आहे, त्यावर त्वरित उपाययोजनांसाठी सज्ज राहता येते.
माहिती मिळाल्यानंतर आग नियंत्रणाचे साहित्य आणि प्रशिक्षित मनुष्यबळ घटनास्थळी लवकरात लवकर पोचविण्यासाठी प्रसंगी विमानांचाही वापर केला जातो. मोठ्या वणव्यांच्या वेळी आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहनही याच संस्थेमार्फत केले जाते आणि तशी संपर्काची यंत्रणाही या संस्थेकडे आहे. पाणी फवारण्याची विमाने काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने घेतली जातात. त्यांच्या नियमित देखरेखीसाठीही सक्षम यंत्रणा या संस्थेकडे आहे. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर पुरविलेले साहित्य पुन्हा जमा करण्याची व त्याचा दर्जा योग्य आहे का, हे तपासण्याचीही स्वतंत्र यंत्रणा आहे.
वणवा मोठ्या प्रमाणावर भडकला असल्यास जंगलातील आतील भागात उतरून तो मर्यादेत राखण्यासाठी प्रशिक्षित चारशे "स्मोकजंपर्स'ची फौजही अमेरिकेने उभारली आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग, हवामानाचा अंदाज यासाठी तेवीसशे ठिकाणी स्वयंचलित हवामान अंदाज केंद्रे (रिमोट ऑटोमोटेड वेदर स्टेशन्स) उभारण्यात आली आहेत. त्यांच्या जोडीला अशी बेचाळीस फिरती केंद्रेही संस्थेच्या दिमतीला आहेत.
ही यंत्रणा वणव्यांच्या नियंत्रणाबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगीही अमेरिकी जनता आणि प्रशासनाला उपयोगी ठरते. न्यू ऑर्लिअन्सला दोन वर्षांपूर्वी बसलेल्या तडाख्याच्या वेळीही सुटका व मदतकार्याचे आव्हान तिने पेलले. संघटित आणि सुनियोजित प्रतिसादाचा हा मंत्र इतरांनीही अनुकरण करावा असाच आहे.
- संजय विष्णू तांबट
संदर्भ - www.nifc.gov
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment