पावसाळ्यात वीकएंडला कुठे जायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत तर तासभर चांगला पाऊस झाला तर रस्त्यावर येणे मुश्कील होते. पण निसर्गाची खरी जादू अनुभवायची असेल तर त्यासाठी गोवा हा एक चांगला पर्याय आहे. सर्वत्र हिरवाईचा साज पांघरलेला गोव्याचा निसर्ग अक्षरशः डोळ्यांत साठवता साठत नाही. एकाहून एक अशी सरस ठिकाणे पाहताना आपल्या मनात जगण्याची नवी उभारी येते. डोंगरकपाऱ्यांवरून खळाळत येणाऱ्या झऱ्यांच्या निर्मळ पाण्यात खेळण्याची मजाही गोव्यात अनुभवता येते. दूधसागर, हरवळे, मैनापी, केसरवाळ असे छोटे-मोठे पन्नासच्या आसपास धबधबे पर्यटकांना खुणावतात. ठिकठिकाणी डोंगर, टेकड्यांवरून घसरगुंडी खेळणारे झरे पाहताना स्वर्गसुखाचा आनंद होतो. विशेष म्हणजे ख्रिसमस, नववर्षादरम्यान लाखाच्या घरात पोचलेले हॉटलचे दर पावसाळ्यात अगदी खाली उतरलेले असतात. त्यामुळे निवासाची सोयही चांगली होते. कविवर्य बा. भ. बोरकरांनी आपल्या अजरामर कवितांतून उतरवलेला पाऊस, या पावसातला निसर्ग प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर गोव्यात पावसाळ्यात गेलेच पाहिजे. गोव्याचा पाऊस मनाला वेड लावणारा आहे. खरं म्हणजे गोव्यात छत्री वापरायची ती केवळ नाचविण्यापुरतीच. कारण गोव्याचा पाऊस छत्रीखालून अनुभवताना नक्की छत्री कोणत्या दिशेला धरावी ते कळत नाही. असे वाटते, हा पाऊस आपल्याभोवती पिंगा तर खेळत नाही ना? कारण एकाच वेळी चारी दिशांनी येणारा पाऊस अंगावर झेलण्याचा अनुभव येथे येतो. नवपरिणितांसाठी गोव्यातल्या पावसात भिजायचा आनंद खरोखरच अवर्णनीय असा ठरू शकतो. गोव्याचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर पावसाळ्यासारखा दुसरा चांगला ऋतू नाही. केवळ "खा, प्या, मजा करा' एवढीच काही गोव्याची संस्कृती नाही. येथे श्रीमंत सांस्कृतिक वारसा नांदतो आहे, त्याचे दर्शन गणेशोत्सव आणि बोंदेरां या उत्सवांमध्ये नक्कीच अनुभवास येते. त्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गोव्याची सैर करणे सर्वांत फायदेशीर. कारण याच कालावधीत भारतीय कॅलेंडरमधला पहिला मोठा सण मानला गेलेला गणेशोत्सव साजरा होत असतो. गोव्यातल्या गणेशोत्सवात मुंबई-पुण्यासारखा धांगडधिंगा नसतो. गोव्यात घरोघरी गणपती पुजला जातो. विशेष म्हणजे गोव्यात आरत्यांना तीन-चार प्रकारच्या चाली लावलेल्या आहेत. इथले तरुण टाळ, सूरपेटी आणि घुमट घेऊन घरोघरी आरतीसाठी फिरतात. शिवाय गोव्यात गणपतीला विविध फळाफुलांच्या ....माटोळीची.... आरास केलेली असते. ते पाहणेही एक सुखद अनुभव आहे. तसेच श्रावण महिन्यात गोव्यातली हॉटेल डेल्मन, मॅरियॉट हॉटेल अशा अनेक हॉटेलांमध्ये अस्सल गोमंतकीय शाकाहारी जेवणाच्या पंगतींचे श्रावण महोत्सवही साजरे केले जातात. गणेशोत्सवाच्या मागेपुढेच चोडण बेटावर बोंदेरां फेस्टिव्हल साजरा केला जातो. आकर्षक पेहराव केलेले लोक इथल्या पारंपरिक गाण्यांवर नृत्य करताना पाहून आपले मनही डोलू लागते, तेव्हा "ग्रीन व्हेकेशन' साजरी करण्यासाठी गोवा "आयडियल प्लेस' आहे. सत्तरी, सांगे हे दोन तालुके पश्चिम घाट परिसरात येतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या प्रदेशातील समृद्ध जैविक संपदेचा अभ्यास करण्यासाठीही पावसाळ्याचा मोसम अतिशय उत्तम आहे. त्यामुळे वैज्ञानिकांना, विद्यार्थ्यांना या प्रदेशात ट्रेकिंग आणि अभ्यास सहली मोलाच्या ठरू शकतात. बहुतांश प्रदेश जंगलाने व्यापलेला आहे. पश्चिम घाटामध्ये मोडणाऱ्या या प्रदेशात पावसाळ्यातील जैविक संपदेचा अनुभव घेण्यासाठी, ट्रेकिंगची मजा अनुभवण्यासाठीही ऑगस्ट- सप्टेंबर महिना उत्तम आहे. काय पाहावे - साळावली धरण : पणजीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर सांगे तालुक्यात आहे. गोव्यातील हे सर्वांत मोठे धरण आहे. येथे पर्यटन खात्याने राहण्याचीही खास सोय केली आहे. याच धरणाजवळ गणपतीचे मंदिरही आहे. धरणामुळे विस्थापित झालेले हे मंदिर सरकारने पूर्वीच्याच साहित्यातून जसेच्या तसे पुन्हा उभारले आहे. हा प्राचीन वारसा पाहताना गोव्यातील पूर्वीचे जीवन किती समृद्ध होते, याचा अनुभव घेता येतो. याच परिसरात राज्य सरकार उभारत असलेले बोटॅनिकल गार्डनही पाहावयास मिळते. - दूधसागर धबधबा : पणजीपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे. या धबधब्याजवळूनच रेल्वे ट्रॅक जातो. रेल्वेतर्फे दूधसागरला जाण्यासाठी खास रेल्वे चालवली जाते. जगातील प्रमुख २३७ धबधब्यांमध्ये दूधसागरचा समावेश होतो. या धबधब्याची उंची ३१० मीटर इतकी आहे. उंचीच्या निकषामध्ये दूधसागर धबधबा भारतातील धबधब्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुळे गावापासून हा धबधबा अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे. - हरवळे धबधबा : डिचोलीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. दूधसागरनंतर पावसाळ्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा "हॉट स्पॉट' मानला जातो. या धबधब्यात २४ फूट उंचीवरून पाणी सरळ खाली पडते. असे मानले जाते, की श्री रुद्रेश्वराची उंची २४ फूट होती. तेवढ्याच उंचीवरून हे पाणी पडत असल्याने या धबधब्याला धार्मिक महत्त्व आहे. या धबधब्यासमोरच रुद्रेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात गोव्यात येणे उत्तम. तसेच या धबधब्याजवळच प्राचीन गुहाही आहेत. -
केसरवाळ धबधबा : पणजी-मडगाव रस्त्यावर वेर्णा गावामध्ये आहे. या धबधब्याच्या पाण्याच्या औषधी गुणांमुळे तो पर्यटकांत प्रसिद्ध आहे. त्वचारोग, विविध शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्ती या धबधब्याखाली अंघोळ केल्यानंतर बऱ्या झाल्याचे अनेक अनुभव आहेत. -
बोंडला अभयारण्य : हरणे, विविध पक्षी, वाघ अशा प्राण्यांबरोबरच येथील प्राणिसंग्रहालयातही मगरी, हत्ती, साप, हरणे पाहावयास मिळतात. येथे पर्यटकांना निवासाची सोयही उपलब्ध आहे. -
खोतीगाव अभयारण्य : काणकोण तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. जंगली भागातील लोकांचे आयुष्य अनुभवण्याबरोबरच येथे हरणे आणि सरपटणारे प्राणी पाहावयास मिळतात. येथे अनेक वनस्पतींच्या जातींचे संवर्धन केले आहे. -
दांडेली अभयारण्य : सांगे तालुक्यात असलेले हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगली खार, काळे चित्ते, वाघ, काळविटे आणि माकडे आणि ठिकठिकाणी किंग कोब्रासारखे अनेक प्रकारचे सर्प पाहावयास मिळतात। -
डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य : प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्यावरून नाव मिळालेल्या या अभयारण्यात अनेक प्रकारचे पक्षी पाहता येतात. चोडण बेटावरील हे अभयारण्य पक्षी निरीक्षकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे. येथे खारफुटीचे जंगल आहे. यामुळेच या बेटाला अनेक "फ्लाइंग वंडर्स'नी आपले घर केले आहे. मगरी, कोल्हे आणि लांडगे हे प्राणीही या बेटावर पाहायला मिळतात. -
जयप्रकाश कुलकर्णी
http://esakal.com/esakal/esakal.nsf/MiddleFrame?OpenForm&MainCategory=Saptarang&category=Saptarang_Paryatan
Monday, July 16, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment