(श्रीदेवी घाटे) "ग्लोबल वॉर्मिंग'चा परिणाम म्हणून किंवा पर्यावरणप्रेम म्हणून म्हणा, पण निसर्ग संवर्धनाचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे। काही उद्योजक, मोठ्या कंपन्याही तसा विचार करत आहेत. या विषयाची इतकी चर्चा सुरू होण्याआधी एका मराठी उद्योजकाने केवळ हा विचारच केला नाही, तर आपल्या उद्योगात त्याची अंमलबजावणी केली. विठ्ठल कामत हे त्यांचे नाव. त्यांचे "ऑर्किड इकोटेल' पाहिल्यावर निसर्ग संवर्धनाचा विचार किती बारकाईने आणि सर्व थरांवर करता येतो, याची प्रचिती आली.
१९९९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत २२ ऑक्टोबर १९९७ रोजी डरबन येथे एक बक्षीस समारंभ झाला. या स्पर्धेत अनेक निसर्ग आणि पर्यावरण प्रेमी देशांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाची तपासणी आणि परीक्षकांच्या कसोटीतून ऑर्किड हेच हॉटेल पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. आतापर्यंत या हॉटेलने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ६० पेक्षा जास्त पारितोषिके मिळविली आहेत. निसर्गावर कमीत कमी भार टाकणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुन्हा पुन्हा वापर आणि काहीही वाया न घालवणे, हा मंत्र या हॉटेलच्या रचनेत जपला आहे. ऐषाराम जरूर करा; पण पर्यावरणाचा तोल बिघडवू नका, सुखसोयींचा जरूर उपभोग घ्या, पण निसर्गाला ओरबाडू नका, मनोरंजनाचा आनंद लुटा; पण हृदयशून्य होऊन निसर्ग व पर्यावरणाचा सत्यानाश करू नका, अशी ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. यातील ७२ खोल्यांच्या खिडक्या स्वागत कक्षाकडे उघडल्याने त्यावर ऊन, पाऊस आणि बाहेरील आवाजाचा परिणाम होत नाही. हॉटेलच्या छपरावर चार फूट खोल पाण्याचा पोहण्याचा तलाव बांधल्याने छपरातून येणारी उष्णता रोखली गेली आहे. भिंतींना क्यूईदी वॉल पॅनेल्स वापरल्याने लाल विटांचा वापर करावा लागला नाही. शिवाय जमिनीची माती वापरून उष्णता आणि आवाजावर नियंत्रण ठेवले आहे. खोल्यातील बाथरूम्स आणि टॉयलेटच्या नळांच्या दाबाचा योग्य वापर केल्याने आवश्यक तेवढेच पाणी येथे वापरले जाते. शिवाय सांडपाणी अजिबात वाया न घालवता त्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा वापर हॉटेलच्या बागकामासाठी आणि वातानुकूलित यंत्रांसाठी केला जातो. रबराच्या झाडाचा चीक काढल्यानंतर निरुपयोगी झालेल्या त्या झाडावर प्रदीर्घ प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ते टणक व जास्त शक्तिमान होते आणि त्यानंतर ते लाकूड अंतर्गत सजावटीसाठी वापरता येते. "सीएफसी' गॅसचा वापर कटाक्षाने टाळून "आर २२' नावाचा निसर्गाचा मित्र नावाने ओळखला जाणाऱ्या गॅसचा वापर केला आहे. वातानुकूलित यंत्रणेतील उष्णतेचा वापर स्नानाचे पाणी गरम करण्यासाठी, लॉंड्रीसाठी, तसेच स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी केला जातो. हॉटेलच्या चिमणीतून निघणारा धूर पांढराच राहील, अशी यंत्रणा आहे. तिथे एअर ब्रशर बसवले आहेत. त्यावर पाण्याचा सतत मारा केल्याने अनावश्यक विषारी कार्बनडाय ऑक्साईड वायू पाण्यात विरघळला जातो. त्यामुळे फक्त पांढरा धूर बाहेर टाकला जातो. "आर्कीड' हे भारतातले "शून्य गार्बेज हॉटेल' आहे. व्हर्मिकल्चर तंत्र वापरून ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले जाते. रूममधले पेन आणि पेन्सिल कार्डबोर्डचा पुनर्वापर करून बनवलेल्या आहेत. लॉंड्रीच्या पिशव्या पुन्हापुन्हा वापरता येईल, अशा कापडाच्या आहेत. कचऱ्याच्या डस्टबीन्सचे मटेरिअल वारंवार पुनर्वापर करून वापरले जाते. प्रत्येकाने वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर असाच विचार केल्यास आपण शहरवासी निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ शकतो.
हा लेख वाचुन 'orchid' होटेल मधे कधीतरी राहण्यास जाण्याची इच्छा आहे. बघुया कधी योग येतोय ते..
0 comments:
Post a Comment