आजच्या सकल्च्या अन्कात वाच्लेला हां लेख....
ब्रिटिश गांधीवादी - लॉरी बेकर
( नीला शर्मा ) ""लॉरी नेहमी सांगत, की गांधीजींचे विचार समजून घ्यायलाच त्यांना ५० वर्षे लागली. आता उर्वरित आयुष्यात ते विचार कृतीद्वारे इतरांसमोर मांडण्यासाठी काम करायचे आहे.'' .......तत्त्वचिंतन वास्तुरचनाकार म्हणून लॉरी बेकर यांचा ठसा भारतीय जनमानसावर उमटलेला आहे. म्हणूनच त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचीही माहिती सर्वसामान्यांना झाली पाहिजे. कमी किमतीत जास्तीत जास्त सुविधा देणारी घरे कशी उभारायची, या विषयावर बेकर यांनी वास्तुपाठ ठरावे असे लेखन केले आहेच. वास्तुरचनाकार म्हणून तो त्यांचा अभ्यास विषय होता. याखेरीज भूकंपप्रवण भागांमध्ये मजबूत घरांच्या निर्मितीचे मंत्र सांगणारे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. "माती'च्या नैसर्गिक गुणधर्मांची महती सांगणारे एक पुस्तक त्यांनी भक्तिभावाने लिहिले आहे. इतर वास्तुरचनाकार सहसा ज्या बाबीकडे फारसे लक्ष देत नाहीत, अशा एका कळीच्या विषयावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे. "कचऱ्याचे व्यवस्थापन' हा तो ज्वलंत विषय. या मूळ इंग्रजी पुस्तकाचे शीर्षक आहे "रबिश.' "हाऊ टू रिड्यूस बिल्डिंग कॉस्ट', "ब्रिक वर्क', "मड', "कम्युनिटी बिल्डिंग्ज', "स्कूल्स' व "रूरल हॉस्पिटल्स' अशा त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकाचे शीर्षकही थेट भिडणारे, अतिशय सोपे व मार्मिक असे आहे. ते पुस्तकाची केवळ संहिता लिहीत नसत, तर रेखाटनेही स्वतःचीच ठेवत. काही पुस्तके तर त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात प्रकाशित केली आहेत. साधेपणा तरीही अचूकता, डामडौल नसलेली आकर्षक मांडणी, व्यावहारिकता वगैरे महात्मा गांधींचे पैलू. ते त्यांच्यातही दिसतात. हे सारे त्यांच्यात कसे आले, तो इतिहास लक्षात घ्यायला हवा. लॉरींचा जन्म इंग्लंडमधला. वर्ष १९१७. पुढे "बर्मिंघम स्कूल ऑफ आर्किटेक्चर' येथून व्यावसायिक शिक्षण घेऊन ते "रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स' या संस्थेशी जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाचा फटका त्यांच्या कामालाही बसला. त्यानंतर शल्यचिकित्सकांच्या फिरत्या गटात ते सामील झाले. भूलतज्ज्ञ म्हणून ते सेवा देत. नंतर चीनच्या पश्चिम भागात कुष्ठरोगावर उपचार आणि नियंत्रण मिळवायच्या मोहिमेत त्यांनी स्वतःला वाहून घेतले. १९४४ मध्ये ब्रिटनला परतण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना मुंबईला बोटीची वाट बघत तीन महिने थांबावे लागले. गांधीजीही तेव्हा तेथेच होते. त्यांचा प्रभाव लॉरींवर एवढा खोलवर झाला, की ते त्यानंतर इंग्लंडला अल्पकाळासाठी गेले आणि मग भारतातच येऊन राहिले. १९४८ मध्ये त्यांनी केरळमधल्या एलिझाबेथ जेकब या समविचारी डॉक्टर महिलेशी विवाह केला. त्यानंतर हिमालयातल्या दुर्गम भागात दीर्घकाळपर्यंत ते राहिले. तेथे त्यांनी डोंगराच्या कुशीत नैसर्गिक ऊन, वारा, उजेड यांच्या उपयोगाचा विचार करून आगळेवेगळे घर बांधले. "डोंगराची दुलई लपेटलेले घर,' असा ते त्याचा उल्लेख करायचे. तेथेच त्यांनी रुग्णालय आणि शाळाही बांधली. या काळात ग्रामीण भारतापुढच्या समस्या आणि खरी परिस्थिती त्यांना बरेच काही शिकवून गेली. स्थानिक वास्तुरचना परंपरेबद्दल त्यांना आस्था होती. लॉरींच्या वडिलांचे देहावसान झाल्यावर त्यांची आईही भारतातच राहायला आली आणि हिमालयातील वास्तव्याने भारावून गेली. नंतरच्या काळात लॉरींनी केरळात स्थलांतर केले. तेथेही ते दुर्गम डोंगराळ भागातल्या दुर्लक्षित आदिवासींमध्ये राहू लागले. या ठिकाणीही त्यांनी एक घर आणि रुग्णालय उभारले. दक्षिणेतल्या ग्रामीण परंपरेतून त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडली. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामात दिसू लागले. १९७० मध्ये त्यांनी आरोग्यविषयक प्रकल्प मित्रमंडळींच्या हाती सोपवून त्रिवेंद्रममध्ये मुक्काम हलवला. त्यानंतर जवळपास अंतापर्यंत ते आरोग्यप्रकल्प, कुष्ठरोग उपचार व नियंत्रण, वास्तुरचनाविषयक काम व बांधकाम, अशा विविध गोष्टी करीत राहिले. शासन व शासनावर टीका करणाऱ्यांमध्येही लॉरींबद्दल कमालीचा आदर बघायला मिळत असे. अनेक औद्योगिक प्रकल्पांसाठीही त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. पर्यायी ऊर्जाविषयक भरीव कामगिरी त्यांनी केली. अशा माणसाला भारतातल्या खेड्यात व शहरांमध्येही इतस्ततः पसरणारा कचरा भेडसावतच असणार. त्यामुळे त्यांनी "रबिश' हे पुस्तक लिहिले. कचऱ्याचे व्यवस्थापन सर्वसामान्यांना समजावून सांगणाऱ्या या पुस्तकाचा "कुडा-कचरा' या शीर्षकाने अरविंद गुप्ता या गांधीवादी अभियंत्याने हिंदी अनुवाद केला आहे. "भारत ज्ञान-विज्ञान समिती'च्या माध्यमातून प्रकाशित झालेले हे पुस्तक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत जागरूक करते. या पुस्तकाच्या प्रारंभी मांडलेला विचार आपल्याला अस्वस्थ करून जातो. गुप्ता म्हणतात, ""घाण आणि केरकचरा घरातूनच सुरू होतो. त्याचे आपण काय करणार आहोत, हे लॉरी बेकर यांना जाणून घ्यायचे आहे.'' लॉरी विचारतात, ""कचऱ्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? त्याची विल्हेवाट तर लावली पाहिजे; पण संपूर्ण वर्षभरात लाखात एखादाच कोणी तरी याबाबत वाचकांच्या पत्रव्यवहारात काही लिहितो.'' ""गांधी जयंती किंवा स्वच्छ व सुंदर शहर वगैरेंसारख्या कार्यक्रमापुरताच कचरा एका जागेहून दुसरीकडे नेण्यात येतो. नेतात ते अशा ठिकाणी, की तो तिथे फारसा कोणाच्या डोळ्यांवर येणार नाही. पण असा तो वाहून नेतानाही इकडेतिकडे सांडतच जातो. आपण आपल्या घरातल्या कचऱ्याचे काय बरे करतो? तो तर फारच वेगाने वाढत असतो. जाळून नष्ट न करता येणारा कचरा आपण खड्ड्यात पुरून टाकतो. केळ्याची साले आणि अंड्याच्या कवचासारख्या वस्तू तर आपण नुसत्याच घराबाहेर भिरकावून शांत बसतो.'' अशा या उद्बोधक पुस्तकाचा तेवढाच चित्तवेधक अनुवाद करणारे गुप्ता लॉरींच्या सहवासात तीन महिने राहिले होते. ते म्हणतात, ""लॉरी नेहमी सांगत, की गांधीजींचे विचार समजून घ्यायलाच त्यांना ५० वर्षे लागली. आता उरलेल्या आयुष्यात जास्तीत जास्त काम ते विचार कृतीद्वारे इतरांसमोर मांडण्यासाठी समर्पित भावनेने करायचे आहे. घरे बांधून घेणाऱ्या ग्राहकाला बरेचदा त्याला स्वतःला काय हवे आहे, तेच माहीत नसते. त्याच्या परिचयातल्या कोणाचे तरी आवडलेले घर बघून तसेच किंवा त्याच्याहीपेक्षा आणखी जास्त शोभिवंत घर बांधून द्यायचा तो आग्रह धरतात. नुसत्या दिखाऊ शोभेच्या घरांपेक्षा पायाभूत सुविधा उत्तम पुरविणाऱ्या घरांची निर्मिती सर्वसामान्यांना पटली पाहिजे.'' - नीला शर्मा
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment